दापोली : बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आंघोळीसाठी गेले… पण परतलेच नाहीत

banner 468x60

दापोली तालुक्यातील टेटवली बौद्धवाडी येथे ४१ वर्षीय अमर शरद कांबळे यांचा बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, अमर शरद कांबळे (वय ४१, रा. टेटवली बौद्धवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) हे ३० जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घरातील बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर घरातील सदस्य व वाडीतील ग्रामस्थांनी बाथरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अमर कांबळे हे पालथे पडलेल्या व बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नातेवाईकांनी त्यांना तातडीने निखील गमरे यांच्या चारचाकी वाहनातून टेटवली येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. भागवत हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर पहाटे ३.३० वाजता अमर कांबळे यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती सिद्धार्थ गणपत गमरे यांनी पोलिसांना दिली.

या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ५२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

अमर कांबळे यांच्या अकाली निधनामुळे टेटवली बौद्धवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *