रत्नागिरी : जंगलात लाकडे गोळा करताना महिलेच्या हातात गावठी बॉम्बचा स्फोट, जांभारी परिसरात 25 जिवंत बॉम्ब सापडल्याने खळबळ

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील जांभारी परिसर मंगळवारी सकाळी एका भीषण स्फोटाने हादरून गेला. वाटद पोलीस चौकी हद्दीतील जांभारी फाटा येथे लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४५, रा. जांभारी फाटा) या मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जवळच्या जंगल परिसरात लाकडे आणण्यासाठी गेल्या होत्या. जंगलात फिरत असताना त्यांना एक संशयास्पद वस्तू दिसली. ती नेमकी काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी ती हातात उचलताच अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की त्यांच्या डाव्या हाताची बोटे तुटून गंभीर दुखापत झाली, तसेच हात आणि शरीराच्या काही भागांवर भाजल्याच्या जखमा झाल्या.

स्फोटाचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात घुमल्याने स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या रेश्मा सुर्वे यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस आणि वाटद पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता जंगल भागात आणखी तब्बल २० ते २५ जिवंत गावठी बॉम्ब आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटके नेमकी कुणी ठेवली, त्यामागचा उद्देश काय होता, याबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर तातडीने सील करून नागरिकांना त्या भागात जाण्यास मज्जाव केला. बॉम्ब शोध आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून स्फोटकांचा सुरक्षित नाश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

दरम्यान, जंगल परिसरात अशा प्रकारे गावठी बॉम्ब सापडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्फोटकांचा संबंध शिकारीशी, जुन्या वादांशी की अन्य कोणत्या बेकायदेशीर कारवायांशी आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *