दापोली-साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर बुधवारी (दि. २० मे) भीषण अपघात घडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. इको वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी मुंबईला नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याने फणसू परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम फडकले आणि त्याचा मित्र अमन खांबे (दोघेही रा. फणसू) हे दापोलीहून फणसूच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. दरम्यान, देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या इको वाहनासोबत त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला आणि शुभम फडकले गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित उपचारासाठी हलवण्यात आले. शुभम याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
या दुर्घटनेमुळे फणसू गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून शुभमच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, देवाचा खळगा परिसरातील हे वळण अत्यंत धोकादायक मानले जाते. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या वळणावर वेगमर्यादा फलक, संरक्षक कठडे, रस्त्यावर परावर्तक चिन्हे तसेच इतर सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













