देवरूख : गव्याच्या धडकेत जखमी स्वप्नील पेडामकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी, स्वप्नील यांच्या निधनाने हळहळ

banner 468x60

देवरूख-रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे गव्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या साडवली सह्याद्रीनगर येथील स्वप्नील पेडामकर (वय ३७) या तरुणाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने साडवली सह्याद्रीनगर परिसरावर शोककळा पसरली असून, मित्रपरिवारासह नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

स्वप्नील पेडामकर हा शुक्रवारी सकाळी कामानिमित्त मोटारसायकलवरून देवरूखहून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. सकाळी साडेआठच्या सुमारास आंबव येथे रस्त्यालगतच्या जंगलातून अचानक एक गवा रस्त्यावर धावत आला. यावेळी स्वप्नीलच्या मोटारसायकलची गव्याला जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, स्वप्नील रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात त्याच्या डोक्यासह हात-पायांना गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने स्वप्नीलला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली त्याची मृत्यूशी झुंज अखेर निष्फळ ठरली.

स्वप्नीलच्या निधनाचे वृत्त समजताच साडवली सह्याद्रीनगर परिसरात शोककळा पसरली. विशेष म्हणजे, स्वप्नीलच्या उपचारासाठी सह्याद्रीनगर मित्रमंडळाने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करून त्यासाठी जमा झालेला निधी त्याच्या उपचारासाठी दिला होता. मित्रांनी केलेल्या या मदतीची परिसरात चर्चा होती. मात्र, सर्वांच्या प्रार्थना आणि डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरत स्वप्नीलची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

स्वप्नीलच्या अकाली निधनाने मित्रमंडळावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सह्याद्रीनगर मित्रमंडळाच्या वतीने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडूनही पेडामकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात येत आहे.

स्वप्नील पेडामकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता साडवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी निधनाने पेडामकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण साडवली सह्याद्रीनगर परिसर शोकमग्न झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *