दापोली : तालुक्यातील माटवण परिसरात म्हशी चारण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. हरि विठ्ठल काते (वय ६५, सध्या रा. माटवण मळगाव, पालगड गवळवाडी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते म्हशी चारण्यासाठी गेले असताना बराच वेळ परत न आल्याने शोधाशोध करण्यात आली. यावेळी काटलीचा पऱ्या येथे ते पाण्यात उपड्या स्थितीत आढळून आले. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरि काते हे अनिल श्रीराम महाडिक यांच्याकडे म्हशी पाळण्याचे काम करत होते. दरवर्षी जुलै ते डिसेंबर या कालावधीत ते गुराखी म्हणून कामासाठी येत असत. त्यांचा नेहमीचा दिनक्रम ठरलेला होता. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास म्हशी चरण्यासाठी घेऊन जाणे आणि दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परत आणणे, तसेच दुपारी ३.३० वाजता पुन्हा म्हशी घेऊन जाणे व सायंकाळी ६ वाजेपर्यंत परत येणे असा त्यांचा दिनक्रम होता.
म्हशी परतल्या; मात्र गुराखी दिसेनात
३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास हरि काते म्हशींना माटवण रोडलगतच्या जंगल परिसरात चरण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र, नेहमीच्या वेळेनुसार सायंकाळी ६ वाजेपर्यंत ते म्हशींसह परत आले नाहीत. त्यामुळे अनिल महाडिक यांनी त्यांची वाट पाहिल्यानंतर शोध घेण्यासाठी जंगल परिसरात धाव घेतली.
यावेळी म्हशी जंगलात दिसून आल्या; मात्र त्यांच्यासोबत हरि काते नव्हते. महाडिक यांनी त्यांना आवाज देऊन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर महाडिक यांनी म्हशींना वाड्यात आणून बांधले.
हरि काते घरी गेले असावेत, या शक्यतेने महाडिक त्यांचा शोध घेण्यासाठी माटवण येथील त्यांच्या घरी गेले. मात्र, ते घरीही आढळून आले नाहीत. त्यानंतर महाडिक आणि त्यांचा मुलगा सोहम यांनी म्हशी पाणी पिण्यासाठी जात असलेल्या परिसरात शोध सुरू केला.
यावेळी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास काटलीचा पऱ्या या ठिकाणी हरि विठ्ठल काते पाण्यात उपड्या स्थितीत पडलेले आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १.४५ वाजता या प्रकरणाची नोंद करण्यात आली.
हरि काते यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पुढील तपासातून माहिती समोर येणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













