कोकणच्या समृद्ध निसर्गपरंपरेत आढळणाऱ्या विविध रानभाज्यांचे महत्त्व, त्यातील पौष्टिकता आणि त्यापासून तयार करता येणाऱ्या नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, या उद्देशाने रामराजे महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुप्रतिक्षित ‘रानमाया २०२६’ या रानभाज्यांपासून बनविलेल्या नावीन्यपूर्ण पदार्थांच्या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. गेल्या अकरा वर्षांपासून महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे हे प्रदर्शन यंदाही दापोलीकरांच्या पसंतीस उतरले.

या प्रदर्शनासाठी ‘नाणीचो वाडो’ कृषी पर्यटन, कुडाळ, सिंधुदुर्गचे संस्थापक स्मितेश तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच दापोली तालुक्याचे कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, रामराजे महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव सचिन गायकवाड, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ , पंचायत समितीच्या उपसभापती नम्रता तोडणकर, संस्थेच्या अध्यक्षा स्मिताली राजपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, स्थानिक व्यवस्थापन समितीचे डॉ. दीपक हर्डीकर, आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे चेअरमन धनंजय यादव, विजय दळवी, मीना रेड्डी, जानकी बेलोसे, रुचिता नलावडे, रेखा जेगरकल, विश्वेश्वरी दरेकर, द फ़र्न समाली हॉटेलचे शेफ मनोज कुमार, यांच्यासह पत्रकार शिवाजी गोरे, सलीम रखांगे,अजीत सुर्वे, प्रवीण शिंदे, ज्योती बिवलकर, महेश महाडिक, सुदेश मालवणकर, सुदेश तांबे, ई. उपस्थित होते.

जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉ. कुणाल मेहता, रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.संदीप बागायतकर, रोटरी क्लबचे सदस्य, लायन्स क्लबचे सदस्य, जेसी सदस्य, दापोलीतील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला उपस्थित राहिले. उपस्थितांनी विविध रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला.
या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे तब्बल ४५ हून अधिक रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेले विविध नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ. यामध्ये भारंगी, टाकळा, कुरडू, कारटोली, चिचाडी, मायाळू, रताळ्याची पाने, प्याव, दार, कुड्याच्या शेंगा, शतावरी, थरबरा यांसह कोकणात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांचा समावेश होता. पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या या रानभाज्यांना आधुनिक पाककलेची जोड देत विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध पदार्थ उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले.
रानभाज्यांमध्ये असलेले नैसर्गिक पोषक घटक, त्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या या नैसर्गिक संपत्तीचा खाद्यपदार्थांच्या माध्यमातून होणारा उपयोग यामुळे प्रदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ‘रानातून थेट ताटात’ या संकल्पनेतून कोकणच्या मातीतला अस्सल रानमेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न या प्रदर्शनातून दिसून आला.
दापोलीकर नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. गेल्या अकरा वर्षांपासून रामराजे महाविद्यालय सातत्याने रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करून कोकणची पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याचे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे, याबद्दल महाविद्यालयाचे तसेच सहभागी विद्यार्थी व आयोजकांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण पदार्थांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता कोकणचा हा रानमेवा आता केवळ जंगल आणि डोंगरदऱ्यांपुरता मर्यादित न राहता आधुनिक खाद्यसंस्कृतीमध्येही आपले स्थान निर्माण करत असल्याचे यावेळी नागरिकांनी नमूद केले.
“रामराजेची रानभाजी… चवीसोबत आरोग्याची हमी!” या घोषवाक्याला साजेसा अनुभव देणारे ‘रानमाया २०२६’ हे प्रदर्शन पारंपरिक कोकणी खाद्यसंस्कृती, स्थानिक जैवविविधता आणि आधुनिक पाककलेचा सुंदर संगम ठरले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











