दापोली तालुक्यातील गिम्हवणे भैरी मंदिर परिसरातील निसर्ग रेसीडेन्सीमध्ये भरवस्तीत घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत सुमारे ४ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निसर्ग रेसीडेन्सीमधील रूम क्रमांक २०३ मध्ये राहणारे फिर्यादी कमलाकर शांताराम मिरजळकर (वय ४७) हे १० एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत घर बंद करून बाहेरगावी गेले होते. याच काळात अज्ञात चोरट्यांनी संधी साधत १० एप्रिल रोजी रात्री सुमारे ९.३० वाजल्यापासून ते १२ एप्रिल दुपारी २ वाजेपर्यंतच्या दरम्यान घरावर डल्ला मारला.
चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी कठीण साधनाच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी थेट बेडरूम गाठत तेथील दोन लोखंडी कपाटांचे दरवाजे उचकटले. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले साडेपाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र, प्रत्येकी ३ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या कुड्या, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच १५ हजार रुपयांची रोकड असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
१२ एप्रिल रोजी दुपारी घरी परतल्यानंतर मिरजळकर यांच्या निदर्शनास घरफोडीचा प्रकार आला. दरवाजाचा कोयंडा तुटलेला आणि कपाटे उचकटलेली पाहून त्यांनी तात्काळ दापोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला व पुरावे गोळा केले.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा क्रमांक ६६/२०२६ नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
भरवस्तीत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः बंद घरे लक्ष्य केली जात असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करून अशा घटनांवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकारी करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*














