दापोली : महिन्यातून एक दिवस गावातच मुक्काम, गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा अभिनव उपक्रम

banner 468x60

दापोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी लोकाभिमुख उपक्रम हाती घेतला आहे. नवरात्रीपासून या उपक्रमाची सुरुवात होणार असून, महिन्यातून एक दिवस मतदारसंघातील एका गावात २४ तास मुक्काम करून ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार आहेत.

या उपक्रमांतर्गत योगेश कदम संबंधित गावातच मुक्काम करणार असून, ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणी आणि गावाच्या विकासाशी संबंधित प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेणार आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित समस्या यावेळी समजून घेतल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे, केवळ ग्रामस्थांशी संवाद साधण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनाही गावात बोलावून नागरिकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्रशासनाकडून तातडीने प्रतिसाद मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा, प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचावे आणि गावागावातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्याने हाताळता यावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

महिन्यातून एक दिवस गावातच मुक्काम करून ग्रामस्थांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासोबतच त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याचा निर्णय योगेश कदम यांनी घेतल्याने या उपक्रमाची चर्चा सुरू झाली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासाला गती देण्याबरोबरच नागरिकांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवरच तोडगा काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *