दापोली येथील नर्सरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर विजेच्या खांबाला आणि झाडाला बांधण्यात आलेली धोकादायक नायलॉनची दोरी अखेर हटवण्यात आली आहे. या गंभीर प्रकाराबाबत “कोकण कट्टा न्यूज”ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित यंत्रणांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी दापोलीतील नर्सरीकडे जाणाऱ्या वर्दळीच्या मुख्य मार्गावर एक अत्यंत धोकादायक प्रकार निदर्शनास आला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला आधार देण्यासाठी नायलॉनची दोरी बांधण्यात आली होती. विशेष म्हणजे, या दोरीचे दुसरे टोक रस्त्याच्या पलीकडील झाडाला घट्ट बांधण्यात आल्याने ती दोरी रस्त्याच्या मधून आडवी गेली होती.
ही दोरी विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता. भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांना, विशेषतः उंच मालवाहू गाड्यांना किंवा ट्रकांना ही दोरी अडकून गंभीर दुर्घटना घडू शकली असती. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर “कोकण कट्टा न्यूज”ने या धोकादायक प्रकाराचे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्त प्रसिद्ध होताच संबंधितांनी तातडीने कारवाई करत ती नायलॉनची दोरी हटवली. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यांवर कोणतीही धोकादायक व्यवस्था उभी करताना संबंधित विभागांनी अधिक जबाबदारीने काम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













