दापोली : 69 ग्रामपंचायतींमध्ये 12 जून रोजी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत, दाभोळ, लाडघर, आंजर्ले, हर्णे, केळशी, मुरुड, चिखलगाव, पालगड सह 69 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत

banner 468x60

दापोली तालुक्यातील मुदत संपलेल्या तसेच आगामी २०२६ वर्षात मुदत संपणाऱ्या एकूण ६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया आता वेग घेत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रभाग रचना आणि सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेअंतर्गत १२ जून रोजी सकाळी ११ वाजता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

banner 728x90


दापोली तालुक्यातील लाडघर, आंजर्ले, हर्णे, केळशी, मुरुड, दाभोळ, चिखलगाव, पालगड यांच्यासह एकूण ६९ ग्रामपंचायतींमध्ये ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
या विशेष ग्रामसभांमध्ये आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सदस्य पदांच्या जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.

मौजे दापोली, लाडघर, सुकोंडी, आंजर्ले, वणौशी तर्फे पंचनदी, शिरखलं , हर्णे, ओणनवसे उर्दूखेर, साखळोळी , खेर्डी कर्दे, कुंम्हवे अडखळ, नानटे, वाहीवणे, गव्हे, साकुर्डे, आसूद, पालगड, कोंडे, असोंड, बुरोंडी, कोळथरे, पाजपंढरी, कोंगळे, कात्रण, गुडघे, चंद्रनगर, चिखलगाव, जामगे, ताडील, पाडले, पांगारी तर्फे हवेली, पिसई, पन्हाळेकाजी, दाभीळ नवशी, टेटवली, टांगर, पोफळवणे, पंचनदी, भोपण, दाभोळ, म्हाळुंगे, मुगीज, मुरुड, वाकवली, विसापूर, वडवली, शिरवणे, केळशी, शिवाजीनगर (साखळोली), शिवाजीनगर (मिहीवणे), शिरसोली, वाघवली, भोपडी, कांगवई, नवानगर, आंबवली बुद्रुक, इरणे, रुखी, वणौशी तर्फे नातू, करंजाळी, तेरवायांगणी, सौंडेघर, माटवण, आडे आणि आवाशी

अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) तसेच महिलांसाठी राखीव जागांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येईल. राज्य शासनाच्या नियमानुसार आरक्षणाची प्रक्रिया आलटून-पालटून राबवली जाणार असल्याने अनेक गावांमधील प्रभागांचे आरक्षण बदलण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या वतीने ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सार्वजनिक पद्धतीने पार पाडली जाणार असून, ग्रामस्थांच्या उपस्थितीतच आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना प्रत्यक्ष प्रक्रियेची माहिती मिळणार असून निवडणुकीपूर्वी आरक्षणाबाबत कोणताही संभ्रम राहणार नाही.


या प्रक्रियेमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार असून, इच्छुक उमेदवार, विद्यमान पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांचे लक्ष आता १२ जून रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर अनेक गावांमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, संबंधित ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी विशेष ग्रामसभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ग्रामपंचायतीच्या भविष्यातील नेतृत्वाची दिशा ठरविणाऱ्या या प्रक्रियेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीतील महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *