चिपळूण : गैरहजेरीचे कारण लेखी दिल्यानंतरही १२ वीच्या विद्यार्थ्याला तासभर कॉलेजमध्ये डांबल्याचा आरोप, पालकांकडून शिक्षकांच्या निलंबनाची मागणी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये एका १२ वी कॉमर्सच्या विद्यार्थ्याला गैरहजेरीबाबत पालकांनी लेखी अर्ज दिल्यानंतरही तब्बल एक तास कॉलेजमध्ये थांबवून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला असून, संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत आपला लढा सुरू राहील, असा इशारा विद्यार्थ्याचे वडील इम्रान घारे यांनी दिला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, १२ वी कॉमर्सचा विद्यार्थी सुफियान इम्रान घारे हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे सलग दोन दिवस महाविद्यालयात गैरहजर होता. त्याबाबत पालकांनी कॉलेज प्रशासनाकडे लेखी अर्ज सादर करून गैरहजेरीचे कारण स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असे असतानाही मुख्याध्यापकांच्या आदेशाचा हवाला देत विद्यार्थ्याला सुमारे एक तास कॉलेजमध्ये थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेनंतर विद्यार्थ्याला मानसिक त्रास झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मुलगा या प्रकारामुळे प्रचंड तणावाखाली असून त्याच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचे वडील इम्रान घारे यांनी सांगितले. “माझ्या मुलाने जर कोणतेही टोकाचे पाऊल उचलले, तर त्यासाठी पूर्णपणे कॉलेज प्रशासन जबाबदार राहील,” असा गंभीर इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला.

घटनेनंतर इम्रान घारे यांनी कॉलेज व्यवस्थापनाची भेट घेऊन संबंधित प्रकाराबाबत जाब विचारला. त्यावेळी व्यवस्थापनाने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यासाठी आठ दिवसांचा अवधी मागितल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसून संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत आपला लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

या घटनेमुळे पालकांमध्येही संतापाची भावना व्यक्त होत असून विद्यार्थ्यांशी वागणुकीबाबत शैक्षणिक संस्थांनी अधिक संवेदनशील राहण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणात शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

पात्रात काय आहे पाहा : माझा मुलगा कु. सुफियान इम्रान घारे, रा. शृंगारतळी हा नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यु. कॉलेज मिरजोळी, ता. चिपळूण येथे इयत्ता १२ वी कॉमर्स या शाखेमध्ये शिकत आहे. दि. २०/०७/२०२६ ते २१/०७/२०२६ या दोन दिवशी कॉलेजला गरैहजर राहिला होता. त्यासंदर्भात माझी पत्नी सौ. समिना इम्रान घारे हिने दि. २१।०७।२०२६ रोजी त्याची वर्गशिक्षीका श्रीम. मोडक मॅडम यांना व्हॉटस्‌अॅपद्वारे माझा मुलगा गैरहजर राहत असलेबाबत कल्पना दिली होती.

तसेच २२।०७।२०२६ रोजी कॉलेजला लेखी अर्ज वर्गशिक्षीका यांचेकडे दिलेला आहे. असे असताना सुध्दा माझ्या मुलाला दुपारी ३ वा. कॉलेज सुटल्यानंतर दुपारी ३ ते ४ असे १ तास कॉलेजमध्ये डांबून ठेवण्यात आले. याची कल्पना माझ्या पत्नीला मिळाल्यावर तिने वर्गशिक्षीका व मॅनेजमेंट यांना कॉल करून त्याला डांबून ठेऊ नका. तो सकाळी ७.३० वा. घरातून कॉलेजसाठी जातो आणि सायं. ४.३० ला घरी येतो. तो उपाशी असतो. त्याला घरी पाठवा. मी किंवा माझे पती यांना सकाळी कॉलेजला पाठवून देतो. परंतु मुख्याध्यापकांचा आदेश असल्यामुळे आम्ही सोडू शकत नाही. असे सांगून फोन ठेऊन दिला व त्याला डांबून ठेवले.

सदरचा प्रकार हा अतिशय वेदनादायी आहे व चीड आणणारा आहे. त्यामुळे माझ्या मुलाची मानसीक स्थिती बिघडली आहे. अशा चुकीच्या गोष्टींमुळे माझ्या मुलाने स्वतःचे काही बरे-वाईट करून घेतल्यास त्यास हे कॉलेज जबाबदार राहील. सदरच्या प्रकारामुळे माझ्या मुलास प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. तरी झालेल्या प्रकारची त्वरीत दखल घेऊन सदर संस्थेवर योग्य ती कारवाई करावी व संबंधीत शिक्षकांना निलंबीत करावी, ही नम्र विनंती.

दरम्यान, या आरोपांबाबत नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच संबंधित शिक्षिका किंवा मुख्याध्यापक यांची बाजूही अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *