पत्नीला सासरीहून घरी घेऊन जाण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादावरून मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि वाहनाच्या तोडफोड झाल्याची घटना चिपळूण शहरातील गोवळकोट रोड अस्मीना प्लाझा येथे परिसरात घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैजान सिकंदर चौगुले (वय २५, व्यवसाय ट्रॅव्हलिंग, रा. खेर्डी मोहल्ला, ता. चिपळूण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुल शेख, शाहीद शेख, बाबू शेख, खालीद शेख, असलम शेख, फारुख बाबासाहेब शेख आणि आमान शेख (सर्व रा. गोवळकोट रोड, चिपळूण) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. ४ जून) रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास फैजान चौगुले हे गोवळकोट रोडवरील अस्मीना प्लाझा येथे आपल्या पत्नी सानिया फैजान चौगुले हिला सासरीहून आपल्या घरी, खेर्डी येथे घेऊन जाण्यासाठी गेले होते. यावेळी उपस्थित असलेल्या आरोपींना त्याचा राग आला. त्यातून त्यांनी फैजान यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
काही वेळातच हा वाद अधिक चिघळला आणि आरोपींनी फैजान यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. फिर्यादींनी “तुम्ही मला मारहाण का करता?” असा जाब विचारताच आरोपी अधिक आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी हातातील लाकडी बांबू आणि लोखंडी पाईपचा वापर करून फैजान यांच्या डोक्यावर, दोन्ही हातांवर, पायांवर तसेच शरीराच्या विविध भागांवर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापती झाल्या.
मारहाणीदरम्यान आरोपींनी, “तू आमची मुलगी पळवून नेली आहेस, त्याची ही शिक्षा भोगत आहेस,” असे म्हणत धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पुढेही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हल्ल्यानंतर आरोपींनी आपला मोर्चा फैजान यांच्या वाहनाकडे वळवला. फैजान यांनी घटनास्थळी आणलेल्या एमएच-०८-झेड-९७८७ क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मारुती सियाझ कारवर बांबू आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वाहनाच्या सर्व काचा फोडण्यात आल्या असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेनंतर जखमी अवस्थेतील फैजान चौगुले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
या घटनेमुळे गोवळकोट रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











