चिपळूण : म्हशींवरून वाद, शेतकऱ्याला काठीने मारहाण, जीवे मारण्याची धमकी

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कुटरे खैरवाडी येथे म्हशींना एकमेकांपासून दूर ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ज्येष्ठ शेतकऱ्याला काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


banner 728x90

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १६ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कुटरे खैरवाडी येथील कॅनॉलजवळ घडली. फिर्यादी एकनाथ आत्माराम जाधव (वय ६५, व्यवसाय शेती) हे आपली म्हैशी व इतर जनावरे चारण्यासाठी घेऊन गेले होते. जनावरे घेऊन घरी परतत असताना आरोपी श्रीकांत केशव खैर (वय ४०) हा देखील आपल्या म्हशींसह तेथे आला होता.

यावेळी म्हशी एकमेकांना मारतील, म्हणून आपल्या म्हशी मागे फिरवाव्यात असे फिर्यादींनी आरोपीला सांगितले. या कारणावरून आरोपी संतापला. त्याने हातातील काठीने फिर्यादींच्या दोन्ही मांडी, पोटऱ्या तसेच दोन्ही हातांवर मारहाण करून दुखापत केली. यानंतर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *