चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८ लाख १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवघ्या सव्वातासाच्या कालावधीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप उचकटून ही धाडसी चोरी केली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवळकोट रोडवरील अल नजु अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नगमा अबीदअली मुजावर (वय ४०) या गुरुवारी (३० जुलै) दुपारी १२.३० ते १.४० या वेळेत घराबाहेर गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाट फोडून त्यातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला.
चोरीस गेलेल्या ऐवजात अडीच तोळ्यांचे तीन सरींचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे मंगळसूत्र, पाच सोन्याच्या चेन, एक नेकलेस, चार जोड कर्णफुले, दहा सोन्याच्या अंगठ्या आणि ८ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, याच दिवशी चिपळूणमधील द्वारका कृष्णकुंज बिल्डिंग, बायपास रोड परिसरातही आणखी एका घरात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही घरफोड्या एकाच टोळीने केल्या असाव्यात का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक २२१/२०२६ नोंदवून भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५(अ) आणि ३३१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांच्या हालचाली आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













