चिपळूण : अलोरेच्या दिव्या चिपळूणकरची राज्यभर झेप! ‘मिसेस महाराष्ट्र 2026’मध्ये सेकंड रनर अपचा मान

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील अलोरे गावच्या दिव्या देवदास चिपळूणकर यांनी मिसेस महाराष्ट्र २०२६ स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत ‘सेकंड रनर अप’ हा मानाचा किताब पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे अलोरे गावासह संपूर्ण चिपळूण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिव्या चिपळूणकर यांनी बालपणापासूनच नृत्य आणि मॉडेलिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. विविध राज्यस्तरीय नृत्य आणि मॉडेलिंग स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाची अनेक पारितोषिके मिळवत त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.

विवाहानंतर पेण येथील शहा परिवारात संसाराची जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी कंटेंट क्रिएटर म्हणूनही आपला प्रवास सुरू ठेवला. पाच वर्षांच्या मुलाचा सांभाळ करत अनेक नामांकित ब्रँडसाठी त्यांनी दर्जेदार आणि सर्जनशील डिजिटल कंटेंट तयार केला.

विवाहानंतर तब्बल बारा वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा निर्धार करत त्यांनी नवी मुंबई येथे आयोजित मिसेस महाराष्ट्र २०२६ स्पर्धेत सहभाग घेतला. आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी ‘सेकंड रनर अप’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावत आपल्या यशाची नोंद राज्यभर घेतली.

दिव्या चिपळूणकर यांचे हे यश अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असून, संसार आणि करिअर यांचा समतोल साधत स्वप्ने पूर्ण करता येतात, याचे त्यांनी उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अलोरे पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *