चिपळूण : अलोरे देवरेवाडी अंगणवाडीचे छत कोसळले, 15 चिमुकल्यांचे दैव बलवत्तर

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील अलोरे देवरेवाडी येथील अंगणवाडी इमारतीच्या वर्गखोलीतील सीलिंग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने घटना घडली त्यावेळी वर्गात शिकणारी सुमारे १५ मुले उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडीच्या वर्गखोलीतील छताचा काही भाग अचानक कोसळला. हा प्रकार मुलांच्या उपस्थितीत घडला असता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे चिमुकल्यांचे दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

या घटनेनंतर ग्रामस्थांनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत. अवघ्या एका वर्षापूर्वी अंगणवाडीच्या दुरुस्ती अथवा बांधकामासाठी निधी खर्च करण्यात आला होता. मात्र इतक्या कमी कालावधीत छत कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तसेच एकाच छताच्या कामावर दोन वेळा खर्च दाखविण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

या संदर्भात वसंत चिपळूणकर आणि सिकंदर चिपळूणकर यांनी जिल्हाधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा तपासावा तसेच मंजूर निधीचा योग्य वापर झाला का याचीही चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

अंगणवाडी ही लहान मुलांच्या शिक्षण, पोषण आणि संगोपनासाठी अत्यंत महत्त्वाची जागा असताना अशा प्रकारे छत कोसळणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, छत कोसळण्याच्या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार, बांधकामाची देखरेख करणारे अधिकारी तसेच इतर जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीअंती काय निष्कर्ष समोर येतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *