मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर बस थांब्यानजीक उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला झायलो कारने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढला असून गंभीर जखमी झालेल्या तीन वर्षीय चिमुरड्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अब्दुल अजीज इम्रान जसनाईक (वय ३, रा. भोस्ते-जसनाईक मोहल्ला) असे मृत बालकाचे नाव आहे. यापूर्वी या अपघातात त्यांच्या आई यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दुर्दैवी घटनेत माय-लेकांना जीव गमवावा लागल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान मुरादअली जसनाईक (वय ४५) हे आपल्या कुटुंबीयांसह झायलो कार (एमएच ०८/झेड ३६९२) घेऊन मुंबईहून खेडच्या दिशेने येत होते. मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर बस थांब्यानजीक त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरवर मागून जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की झायलो कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
या अपघातात चालक इम्रान जसनाईक, पत्नी सबिया मारूख जसनाईक (३३), सेहरा मारूख जसनाईक (७) आणि तीन वर्षीय अब्दुल अजीज इम्रान जसनाईक हे गंभीर जखमी झाले. तर मदिहा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत होते. मात्र उपचारापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या अब्दुल अजीज याच्यावर मुंबईतील अपोलो रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. डॉक्टरांकडून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र अखेर शनिवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
या दुर्दैवी घटनेमुळे जसनाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका अपघातात माय-लेकांचा मृत्यू झाल्याने भोस्ते परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघातप्रकरणी चालक इम्रान मुरादअली जसनाईक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













