प्रधानमंत्री ग्रामीण घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खोटा उत्पन्न दाखला सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे खुर्द येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस ठाणे येथे ९ जून २०२६ रोजी दुपारी १.४४ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक १६७/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी मनोहर शंकर गायकवाड (वय ५५) यांनी फिर्याद दिली आहे. ते मार्गताम्हाणे येथील ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिंग श्रीपत चव्हाण हे मार्गताम्हाणे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर ३१ जानेवारी २०२६ पर्यंत कार्यरत होते. मे २०२१-२२ या आर्थिक वर्षात त्यांचे प्रत्यक्ष उत्पन्न १ लाख ४७ हजार १०९ रुपये इतके असतानाही त्यांनी केवळ ६० हजार रुपये उत्पन्न असल्याचा दाखला प्राप्त केला.
त्यानंतर या उत्पन्न दाखल्याचा वापर करून आरोपीने शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर करून घेतल्याचा आरोप आहे. या योजनेचा लाभ घेऊन मे २०२२ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मार्गताम्हाणे खुर्द येथे घरकुलाचे बांधकाम करण्यात आले.
चौकशीत उत्पन्नाबाबत चुकीची माहिती देऊन शासकीय योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित प्रकरणाची नोंद करण्यात आली. शासनाची आर्थिक फसवणूक करून अपात्र असूनही लाभ घेतल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या कागदपत्रांची, उत्पन्न नोंदींची तसेच योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभाची सखोल चौकशी सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













