चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात अलोरे- शिरगाव पोलिसांना यश आले.
मंगळवारी रात्री ही कारवाई केली आहे. या ट्रकमधून २२ गुरांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. ही गुरे लोटे येथील गोशाळेत सुरक्षितस्थळी हलवण्यात आली आहेत. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूणमधून गोवंशची वाहतूक होत असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. तर गेल्या काही वर्षांत गोवंश वाहतुकीप्रकरणी अनेकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री खेर्डी येथून गोवंशची वाहतूक होणार असल्याची माहिती भाजप पदाधिकारी विनोद भुरण व कार्यकर्त्यांना समजली. यामुळे या सर्वांनी गोवंशच्या वाहतुकीवर लक्ष ठेवले होते.
ज्या ट्रकमधून गुरांची वाहतूक होत होती. त्या ट्रकचा पाठलाग केला. तसेच याबाबतची माहिती अलोरे- शिरगाव पोलिसांना देत या ट्रकवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर अलोरे – शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी कुंभार्ली घाटमाथ्यावरील पोलिसांना तशा सूचना केल्या.
दरम्यान, गुरांची वाहतूक करणारा ट्रक कुंभार्ली घाटात आला असता तेथे असलेल्या पोलिसांनी या ट्रकला थांबवले. तोपर्यंत भाजपचे पदाधिकारी विनोद भुरण व कार्यकर्ते तेथे पोहोचले होते. या सर्वांच्या समोर या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये कोंबलेली गुरे आढळून आली. दोन-चार नव्हे तर तब्बल २२ गुरे (बैल) आढळून आली. यामध्ये तीन गुरे जखमी अवस्थेत असल्याचे समोर आले.
यानंतर पोलिसांनी ट्रक अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. तर गुरांच्या बेकायदा वाहतुकीप्रकरणी दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इक्बाल खेरटकर (रा. खेर्डी) तर ट्रक चालक. नलवडे (रा. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या कारवाईने गुरांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















