चिपळूण : परशुराम घाटात अपघात प्रकरणीचालकाविरोधात गुन्हा दाखल, कंटेनरची दुचाकीला धडक, 25 वर्षीय सौरभ वाघेचा मृत्यू

banner 468x60

चिपळूण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात भरधाव कंटेनरने रस्त्याचा दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कळवंडे येथील सौरभ महादेव वाघे (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास परशुराम मंदिराकडे जाणाऱ्या गेट क्रमांक २ जवळील वळणावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक विपुल राम अवतार सिंग (वय २७, रा. हाथौडी, ता. मेहनगर, जि. आझमगड, उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच ४६ बीयू ५३९१) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. परशुराम घाटातील तीव्र उतार आणि अवघड वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यानंतर भरधाव कंटेनर रस्त्याचा दुभाजक ओलांडून थेट गोवा-मुंबई मार्गिकेवर गेला. याचवेळी समोरून येणाऱ्या पॅशन प्रो दुचाकीला (एमएच ०८ एएम ६४२२) कंटेनरने जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार सौरभ महादेव वाघे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कळवंडे येथील सातीनवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

वडिलांच्या फिर्यादीवरून चालकाविरोधात गुन्हा

या अपघातास कंटेनर चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप मयत सौरभचे वडील महादेव सखाराम वाघे (वय ५५) यांनी फिर्यादीत केला आहे. त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.५४ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

परशुराम घाटातील अवघड वळणे आणि तीव्र उतार पुन्हा एकदा अपघाताच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.