मंडणगड : 14 प्रलंबित नळपाणी योजना 15 दिवसांत पूर्ण करा,राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील प्रलंबित नळपाणी योजनांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करा. यासाठी पुढील १४ ते १५ दिवसांची मुदत निश्चित करून सर्व १४ प्रलंबित योजना पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. तसेच या कामांचा दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंडणगड पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजना आणि संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, अपूर्ण कामे आणि आगामी काळातील पाणीटंचाईचा संभाव्य धोका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे, असे निर्देश योगेश कदम यांनी दिले. संभाव्य टंचाईच्या काळात नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी लहान टँकरची व्यवस्था करणे, स्वतंत्र टँकर खरेदीचा प्रस्ताव तयार करणे, तसेच तालुक्यातील शासकीय आणि खासगी विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आवश्यकता भासल्यास खासगी जलस्रोत अधिग्रहित करण्याचे नियोजनही आधीच करून ठेवावे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ऐन पाणीटंचाईच्या काळात प्रशासनाची धावपळ होणार नाही आणि नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा करता येईल, यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला.

दरम्यान, तालुक्यातील ३१० वनराई बंधाऱ्यांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. यामध्ये नादुरुस्त असलेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच पाण्याच्या चेंबर्सच्या दुरुस्तीसाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाचे पाणी अडवून त्याचा भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी उपयोग व्हावा, यादृष्टीने या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी राजेंद्र आंधळे यांच्यासह ग्रामसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रलंबित नळपाणी योजनांसाठी १५ दिवसांची मुदत निश्चित केल्याने आता संबंधित कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतात का आणि नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होतो का, याकडे तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.