रत्नागिरी जिल्ह्यातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस दलामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) चिपळूण तालुक्यात मोठी धडक कारवाई केली आहे. पिंपळी खुर्द येथील एका लाकूड कापणी गिरणीच्या (सॉ मिल) आवारात बेकायदेशीररीत्या गांजाच्या झाडांची लागवड करून त्यांची जोपासना करणाऱ्या एका २० वर्षीय परप्रांतीय तरुणास पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून १ लाख ३८ हजार ३०० रुपये किमतीची ५ किलो ५३२ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला पिंपळी खुर्द येथे बेकायदेशीर गांजा लागवड सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळी खुर्द येथील पटेल सॉ मिलच्या आवारात एनडीपीएस कायद्यांतर्गत छापा टाकला.
या छाप्यादरम्यान सॉ मिलमधील कामगारांच्या निवासासाठी असलेल्या खोलीत राहणारा अभय प्रदीप पांडे (वय २०, मूळ रा. मलापांडे, कापुरवा, पो. कुचेरा, ता. मिल्कीपूर, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश) हा तरुण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजा (कॅनॅबिस) या अंमली वनस्पतींची विनापरवाना लागवड व जोपासना करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचांसमक्ष ही सर्व गांजाची झाडे जप्त केली असून, त्यांची एकूण किंमत १ लाख ३८ हजार ३०० रुपये इतकी आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी चिपळूण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांच्या पथकाने पार पाडली. जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













