चिपळूण तालुक्यातील कामथे येथे उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेत असलेल्या एक दिवसाच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अधिक उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात घेऊन जात असताना कामथे परिसरात बालकाची हालचाल थांबली. त्यानंतर त्याला तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच बालकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद महादेव पटेकर यांच्या सून दिव्यांका दुर्वास पटेकर (वय ३२) यांना पुरुष जातीचे नवजात बालक झाले होते. बालकाला अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने १०८ रुग्णवाहिकेतून डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्यात येत होते.
दरम्यान, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी रुग्णवाहिका कामथे येथे आली असता नवजात बालकाची हालचाल थांबल्याचे लक्षात आले.
त्यामुळे रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी बालकाला जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता बालक उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.
या घटनेची नोंद दाभोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. ही नोंद २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.५९ वाजता करण्यात आली आहे.
एक दिवसाच्या नवजात बालकाच्या मृत्यूमुळे पटेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत वैद्यकीय तपासणीनंतरच अधिक स्पष्टता येऊ शकेल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











