दापोली : येथे घरफोडी, बेडमधील कप्प्यात ठेवलेले 1 लाख 66 हजारांचे दागिने, रोकड लंपास

banner 468x60

दापोली तालुक्यातील अडखळ येथील जुईकर मोहल्ला परिसरात घरातील लाकडी बेडच्या कप्प्यात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे.

याप्रकरणी फैरोजा अब्दुल रहिम वाकणकर (वय ५७, रा. अडखळ, जुईकर मोहल्ला, ता. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहत्या घरात घडली. फिर्यादी यांनी आपल्या बेडरूममधील लाकडी बेडच्या कप्प्यात सोन्याचे विविध दागिने आणि रोख रक्कम ठेवली होती. मात्र, काही कालावधीनंतर तपासणी केली असता हे दागिने आणि रोख रक्कम जागेवर आढळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने बेडचा कप्पा उघडून कोणतीही संमती न घेता चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.


या चोरीमध्ये १६ हजार रुपये रोख रक्कम, ३ ग्रॅम वजनाची लहान मुलांची सोन्याची चैन, ४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा कानातील जोड, ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन जोड, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन जोड, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, लहान मुलींच्या मापाच्या सहा सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी १ ग्रॅम वजनाची तीन सोन्याची बिस्किटे आणि ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


घटनेनंतर फिर्यादी घाबरून गेल्याने त्यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी दुपारी २.५४ वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्हा क्रमांक २५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
घरातील बेडच्या कप्प्यात सुरक्षित ठेवलेले दागिने चोरीला गेल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या चोरीचा तपास करून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.