चिपळूण : विहरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या पिल्लाला जीवदान, वनविभागाच्या रेस्क्यू टीमचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे उमरोली घोणसरे गावात भडवळकरवाडी येथे विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पॅंथर) पिल्लाला वनविभागाच्या पथकाने धाडसी मोहिम राबवत सुखरूप बाहेर काढले. वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीचे राज्याचे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी कौतुक केले. त्यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वन अधिकारी प्रियांका लगड आदी उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले की, ब्लॅक पॅंथर हा अत्यंत दुर्मीळ वन्यप्राणी असून त्याचे अस्तित्व मोजक्याच ठिकाणी आढळते. गेल्या तीन-चार महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारे ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वनविभागाने त्याला सुखरूप वाचवण्याची ही दुसरी घटना आहे. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केलेल्या कामगिरीवरून त्यांची कार्यक्षमता दिसून येते. या पथकाची कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रासाठी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. जिल्ह्यातील प्रमुख वनाधिकारी महिला असून, त्या अत्यंत सक्षमपणे आणि धाडसाने वन्यप्राण्यांच्या बचाव मोहिमा हाताळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करत असलेले काम अभिमानास्पद असल्याचे सामंत म्हणाले.


या संपूर्ण बचाव मोहिमेदरम्यान काळ्या बिबट्याने कोणत्याही नागरिकाला किंवा वनविभागाच्या कर्मचाऱ्याला इजा केली नाही. तसेच वनविभागानेही त्याला कोणतीही हानी न पोहोचवता सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढले. वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी संपूर्ण रेस्क्यू टीमचे आभार मानले.
या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरात नागरिकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले होते. वनविभागाच्या तत्परतेमुळे एका दुर्मीळ वन्यजीवाला नवजीवन मिळाले आहे.