गुहागर : तालुक्यात 67 वर्षीय वृद्धाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

banner 468x60

गुहागर तालुक्यातील गोणवली-कळेवाडी येथे एका ६७ वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर) उघडकीस आली. यशवंत महादेव कळे (वय ६७, रा. गोणवली-कळेवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९.५० वाजण्याच्या सुमारास किंवा त्यापूर्वी यशवंत कळे यांनी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.


दरम्यान, शेजारी राहणारे समीर सुरेश कामेरकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी यशवंत कळे हे मृतावस्थेत असल्याचे पाहिल्यानंतर तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.


घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यशवंत कळे यांनी आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *