दापोली : पालगडच्या रस्ते विकासाला 1 कोटींचा निधी, मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन!

banner 468x60

दापोली तालुक्यातील पालगड येथील रस्ते विकासाला चालना मिळणार असून, कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत तब्बल १ कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते विकासकामांचे भूमिपूजन मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

पालगड येथून दापोलीला जोडणाऱ्या ग्रामा-३० या रस्त्याच्या सुधारणेसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमध्ये रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण तसेच गटार बांधकामाचा समावेश आहे. या कामांमुळे पालगड परिसरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यास मदत होणार असून, स्थानिक नागरिकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान मंत्री योगेश कदम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी विविध स्थानिक प्रश्न आणि विकासकामांसंदर्भातील निवेदने त्यांच्याकडे सादर केली. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्यांनी उर्वरित रस्त्याच्या कामासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

पालगडच्या रस्ते विकासासाठी निधी उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीनेही या रस्त्याच्या सुधारणेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मंडळ तसेच शिवसेना शाखा पालगडचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *