संगमेश्वर तालुक्यात वयोवृद्ध महिलेचा सांभाळ करावा लागत असल्यामुळे आपल्याला बाहेर फिरायला जाता येत नाही, या रागातून ९१ वर्षांच्या वृद्ध महिलेला लाकडी बांबूने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथे घडली आहे. या मारहाणीत वृद्ध महिलेच्या हात, पाय आणि गुडघ्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी नाशिरा अस्लम मोडक (रा. नायरी, ता. संगमेश्वर) या महिलेविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील सीवूड्स, नेरूळ येथे वास्तव्यास असलेल्या जैबुन्निसा निजामउद्दीन लांबे (वय ६०) यांच्या आई जलेखा इसाक मोडक (वय ९१) या संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथे राहतात. वयोमानामुळे जलेखा मोडक यांना दैनंदिन कामांसाठी तसेच देखभालीसाठी इतरांच्या मदतीची आवश्यकता असते.
मात्र, वृद्ध महिलेचा सांभाळ करावा लागत असल्याने आपल्याला घराबाहेर कुठेही जाता येत नाही, या कारणावरून नाशिरा मोडक यांच्या मनात राग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वादातून लाकडी बांबूने मारहाण
२५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान नायरी येथील राहत्या घरात या कारणावरून वाद झाला. यावेळी नाशिरा मोडक यांनी रागाच्या भरात जलेखा मोडक यांना हातातील लाकडी बांबूने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत वृद्ध महिलेच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला आणि उजव्या मनगटाला दुखापत झाली. वयाच्या ९१ व्या वर्षी अशा प्रकारे मारहाण झाल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
नवी मुंबईत तक्रार; गुन्हा संगमेश्वर पोलिसांकडे वर्ग
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी वृद्धेच्या मुलीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सुरुवातीला शून्य क्रमांकाने नोंदवण्यात आलेला हा गुन्हा सीसीटीएनएस प्रणालीद्वारे पुढील कार्यवाहीसाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
त्यानंतर १ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११५(२) आणि ११८(१) अन्वये नाशिरा अस्लम मोडक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका अतिवृद्ध महिलेवर झालेल्या मारहाणीच्या या घटनेमुळे परिसरात नाराजी व्यक्त होत आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













