विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चिखलगाव येथील तांत्रिक विभागाने राबविलेल्या ‘कौशल्य स्किल बॉक्स’ या अभिनव उपक्रमाची शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उपक्रमासंदर्भात शासकीय परिपत्रक निर्गमित झाल्याने विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कार्याचा गौरव झाला आहे.

इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांची ओळख करून देणे, त्यांच्यात प्रयोगशीलता आणि सर्जनशीलता वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी तयार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील गोदूताई जांभेकर विद्यालयात लोकमान्य टिळक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन विभागाच्या पथकाने ‘कौशल्य स्किल बॉक्स’ उपक्रमाचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात रत्नागिरी परिसरातील १५ शाळांचे सहशिक्षक सहभागी झाले.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे, तंत्रशिक्षण विभागप्रमुख शैलेश खुळे, तांत्रिक विभागातील शिक्षक आणि संपूर्ण पथकाने मेहनत घेतली. या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अॅड. कैवल्य दांडेकर यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच उपक्रमाची दखल घेऊन त्याला व्यापक स्तरावर प्रोत्साहन देण्यात शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.

शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाला शासनस्तरावर मिळालेली दखल ही संस्था, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची पावती मानली जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक शाळांपर्यंत कौशल्याधारित शिक्षण पोहोचण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

लोकमान्य टिळक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, चिखलगावच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. कैवल्य दांडेकर, मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे, तंत्रशिक्षण विभागप्रमुख शैलेश खुळे, तांत्रिक विभागातील शिक्षक आणि संपूर्ण पथकाचे अभिनंदन होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













