चिपळूण पोलीस ठाण्याच्या गेट क्रमांक २ जवळ विनापरवानगी जमाव जमवून धरणे आंदोलन आणि निदर्शने केल्याप्रकरणी महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह २५ ते ३० जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी १२.४५ या वेळेत घडल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल संकेत विजय गुरव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३, १८९, १९० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११०/११७ आणि ११२/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पदाधिकाऱ्यांचा समावेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अनिकेत साळवी (वय ३४, रा. खेर्डी, चिपळूण), मुजफ्फर ऊर्फ राजेश मुल्लाजी (वय ४२, रा. सावर्डे, उत्तर जिल्हाध्यक्ष), ॲड. प्रसाद करंदीकर (वय ४०, अध्यक्ष, महाराष्ट्र लोकाधिकार समिती), योगेश भारत वाघमारे (वय ४६, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र लोकाधिकार समिती) आणि अनंत शिंदे (वय ३६, रा. अलोरे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष) यांच्यासह सुमारे २५ ते ३० जणांचा समावेश आहे.
पोलीस आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप
पोलिसांच्या फिर्यादीनुसार, संबंधित व्यक्तींनी समान उद्देशाने एकत्र येत महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे फलक लावले. तसेच पोलिसांनी दिलेल्या आदेश व नोटिशीचे उल्लंघन करून चिपळूण पोलीस ठाण्याच्या गेट क्रमांक २ जवळ मुख्य रस्त्यालगत विनापरवानगी जमाव जमवला. यावेळी धरणे आंदोलन व निदर्शने करून पोलिसांविरोधात मोठ्या आवाजात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप आहे. या कृतीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासाची माहिती अद्याप उपलब्ध नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













