अन्न व औषध प्रशासनाचा अधिकारी असल्याचे भासवून कारवाईची भीती दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार चिपळूण शहरात समोर आला आहे. महालक्ष्मी चायनीज सेंटरचे चालक रणवीर सावंत यांना संदीप शिंदे नावाच्या व्यक्तीने फोन करून कारवाईची धमकी दिली आणि ती टाळण्यासाठी पाच हजार रुपये ऑनलाइन पाठवण्याची मागणी केली. मात्र, संशय आल्याने संबंधितांनी खातरजमा केल्यामुळे संभाव्य आर्थिक फसवणूक टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संबंधित व्यक्तीने रणवीर सावंत यांना फोन करून आपण अन्न सुरक्षा विभागाचा अधिकारी असल्याचे सांगितले. हॉटेलचे आवश्यक परवाने आणि कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल नसल्याचा दावा करत हॉटेल सलग २४ दिवसांसाठी सील करण्यात येईल, तसेच न्यायालयात ६५ हजार ८०० रुपयांचा दंड होऊ शकतो, अशी भीती घातली.
या कथित कारवाईमुळे चिंतेत पडलेल्या हॉटेल चालकाने तोडगा विचारला असता, कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी संबंधित व्यक्तीने व्हॉट्सॲपवर ऑनलाइन पेमेंटचा स्कॅनर पाठवून पैसे भरण्याचा दबाव आणल्याचे सांगण्यात आले.
या प्रकाराबाबत रणवीर सावंत यांनी माजी नगरसेवक तथा हॉटेल व्यावसायिक संजय तांबडे यांना माहिती दिली. संभाषणातील संशयास्पद बाबी लक्षात घेऊन तांबडे यांनी अन्न सुरक्षा विभागाचे अधिकृत अधिकारी परदेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी संदीप शिंदे या नावाची व्यक्ती संबंधित विभागात कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती आहे.
वेळीच खातरजमा केल्यामुळे हॉटेल चालकाची संभाव्य आर्थिक फसवणूक टळली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनी अनोळखी व्यक्तींच्या फोनवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची ओळख तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांच्या नावाने फोन आल्यास सतर्क राहा
शासकीय अधिकारी असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवत पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तींपासून व्यावसायिकांनी सावध राहावे. कोणत्याही दबावाखाली पैसे पाठवू नयेत. संबंधित विभागाच्या अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधून माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन संजय तांबडे यांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













