वडिलांना विजेचा जोरदार धक्का बसून ते बेशुद्ध पडल्याचे पाहताच त्यांचे प्राण वाचवण्यासाठी धावून गेलेल्या मुलाचाही विजेच्या संपर्कात आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना संगमेश्वर तालुक्यातील पुर झेपलेवाडी येथे घडली. धिरज रामचंद्र झेपले (वय २७) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने झेपले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुर झेपलेवाडी येथील रामचंद्र बुधाजी झेपले यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूममध्ये दिव्यासाठी विद्युत वाहिनी नेण्यात आली होती. ही वायर घराच्या मागील छपराच्या लोखंडी अँगलवरून गेली होती. मात्र, विद्युत वाहिनी खराब होऊन तिचा संपर्क लोखंडी अँगलशी आल्याने छपराच्या लोखंडी सांगाड्यात विद्युत प्रवाह उतरल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शनिवारी सायंकाळी रामचंद्र झेपले हे आंघोळीसाठी पाणी घेण्याकरिता घराच्या मागील बाजूस गेले होते. त्यावेळी त्यांचा हात विद्युत प्रवाह उतरलेल्या लोखंडी सळीला लागला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते जागीच बेशुद्ध होऊन कोसळले.
वडील बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे पाहून मुलगा धिरज झेपले त्यांना वाचवण्यासाठी तातडीने धावला. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येण्यापूर्वीच त्याचाही हात त्याच लोखंडी सळीला लागला. त्यामुळे धिरजला देखील विजेचा तीव्र धक्का बसून तो बेशुद्ध पडला.
घटनेनंतर घरातील सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी दोघांनाही विद्युत संपर्कापासून दूर करून तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर धिरज झेपले याला मृत घोषित केले.
या घटनेची देवरूख पोलिसांनी नोंद घेतली असून, आकस्मिक मृत्यू क्रमांक ४६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करत आहेत.
वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या मुलाचाच काळाने घात केल्याने पुर झेपलेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तरुण मुलाच्या अकाली निधनाने झेपले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













