रत्नागिरी : महानगर गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून रत्नागिरीतील वृद्धाची 2 लाख 73 हजारांची सायबर फसवणूक

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गॅस पुरवठा बंद होण्याची भीती दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाला बनावट ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ७३ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा गंभीर प्रकार रत्नागिरी शहरात समोर आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या वृद्धाच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पटवर्धनवाडी येथील आकांक्षा सोसायटीत राहणारे राजेंद्र दंडाप्पा गडवी (वय ६६ वर्षे) यांना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वाचार ते सव्वापाच या वेळेत एका अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण महानगर गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तुमचा गॅस पुरवठा तात्काळ खंडित होणार असून तो चालू ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो, असा बनाव रचला. गॅस बंद होईल या भीतीने गडवी यांनी समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला.

त्यानंतर भामट्याने गडवी यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘Mahanagar Gas Bill Update’ नावाची एक संशयास्पद ॲप्लिकेशन फाईल (APK) पाठवली. ती फाईल मोबाईलमध्ये ओपन करण्यास भाग पाडून त्याद्वारे ज्येष्ठ नागरिकाच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती भरून घेतली. ही गोपनीय माहिती मिळताच भामट्याने क्षणात गडवी यांच्या खात्यातून परस्पर २ लाख ७३ हजार रुपयांची रक्कम परस्पर वर्ग करून गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

या प्रकरणी राजेंद्र गडवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० च्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर, अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या अशा कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नये आणि मोबाईलवर येणाऱ्या संशयास्पद लिंक्स किंवा ॲप्लिकेशन फाईल्स उघडू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *