खेडच्या आंबवलीतून ‘आपुलकीचा मुक्काम’ उपक्रमाला सुरुवात; मंत्री योगेश कदमांचा जुन्या कोकणी घरात मुक्काम, ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद

banner 468x60

आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांचे जीवन, समस्या, अपेक्षा आणि संस्कृती जवळून जाणून घेण्याच्या उद्देशाने मंत्री योगेश कदम यांनी ‘आपुलकीचा मुक्काम’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. खेड तालुक्यातील आंबवली येथील देऊळवाडीमधून या उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला. यावेळी मंत्री योगेश कदम यांनी गावातील यादव कुटुंबीयांच्या सुमारे ६० वर्षे जुन्या पारंपरिक कोकणी वास्तूमध्ये मुक्काम केला.


संध्याकाळी उशिरा मंत्री योगेश कदम गावातील वस्तीवर पोहोचले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात आणि आपुलकीने स्वागत केले. गावकऱ्यांच्या या प्रेमळ स्वागताने आपण भारावून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात योगदान दिलेल्या यादव कुटुंबीयांच्या पारंपरिक घरात मुक्काम करण्याचा योग या निमित्ताने आला. कोकणातील पारंपरिक घराची रचना, साधी राहणी, स्थानिक खाद्यसंस्कृती आणि माणसांमधील जिव्हाळा अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली.


या मुक्कामादरम्यान योगेश कदम यांनी यादव कुटुंबीयांसह स्थानिक ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. यादव कुटुंबीयांचे सैन्यदलातील सेवेचे अनुभव, त्यांच्या आठवणी, गावाचा इतिहास, बदलती जीवनशैली तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातील सुख-दुःख यांची माहिती त्यांनी जाणून घेतली.


विकासकामांसोबतच मतदारसंघातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या जीवनपद्धतीचा आणि स्थानिक परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आवश्यक आहे, या भावनेतून ‘आपुलकीचा मुक्काम’ हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
केवळ गावाला भेट देऊन परतण्याऐवजी गावकऱ्यांसोबत राहणे, त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अनुभव घेणे आणि त्यांच्याशी थेट संवाद साधणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न समजून घेण्यासाठी अशा संवादातून मदत होऊ शकते.


आंबवलीच्या देऊळवाडीतील पहिल्याच मुक्कामात अनुभवायला मिळालेली ग्रामस्थांची आपुलकी, कोकणी संस्कृतीची ऊब आणि माणुसकीचा जिव्हाळा कायम स्मरणात राहील, अशी भावना मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली. आता या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील इतर गावांमध्येही मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधला जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *