रत्नागिरी तालुक्यातील रानपाट गोणबरेवाडी येथे घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या बिबट्याला वन विभागाच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वन विभागाने तत्परतेने बचाव मोहीम राबवत बिबट्याला सुरक्षितपणे पकडले. वैद्यकीय तपासणीत बिबट्या निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रानपाट गोणबरेवाडी येथील रहिवासी अनंत रामा गोनबरे यांच्या घरासमोरील कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटलांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता बिबट्या खुराड्यामध्ये शांत बसलेला आढळून आला.
बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध बचाव मोहीम हाती घेतली. खुराड्याच्या दरवाजाला लोखंडी ग्रील आणि प्लायवूड लावून दरवाजा अर्धवट बंद करण्यात आला. त्यानंतर दरवाजासमोर लोखंडी पिंजरा लावण्यात आला. वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या या नियोजनामुळे बिबट्या थेट पिंजऱ्यात जेरबंद झाला. या कारवाईनंतर परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
जेरबंद केलेल्या बिबट्याला जाकादेवी येथे नेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत बिबट्या निरोगी आणि सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
ही कारवाई रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव, जाकादेवीच्या वनरक्षक शर्वरी कदम, कांदळवन कक्षाचे किरण पाचारणे आणि धनंजय यादव, तसेच महेश धोत्रे व दीपक कदम यांनी सहभाग घेतला.
वन विभागाच्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बिबट्याला सुरक्षितपणे पकडून त्याची आरोग्य तपासणी करता आली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आल्याने ग्रामस्थांनी वन विभागाच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













