संगमेश्वर तालुक्यातील कुळ्ये साळवीवाडी येथील नवीन नवलाई मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर असलेल्या स्टीलच्या दानपेटीचे कुलूप फोडून त्यातील अंदाजे दोन हजार रुपयांची रोख रक्कम तसेच मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर आणि हार्ड डिस्क असा एकूण ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार देवरुख पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत कुळ्ये गावातील नवीन नवलाई मंदिरात घडली. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या स्टीलच्या दानपेटीचे कुलूप फोडून चोरट्याने त्यातील अंदाजे दोन हजार रुपये रोख रक्कम चोरली. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर आणि हार्ड डिस्कही चोरून नेण्यात आली.
या चोरीप्रकरणी अनिल राजाराम साळवी (वय ६४, मूळ रा. कुळ्ये साळवीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, सध्या रा. घाटकोपर, मुंबई) यांनी तक्रार दिली आहे.
दरम्यान, आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुळ्ये गावातील मुंबई मंडळाचे सदस्य गावी आल्यानंतर झालेल्या बैठकीत या चोरीच्या घटनेबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेनंतर काही कालावधीने तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी विलंबाने गुन्ह्याची नोंद केली आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०५ आणि ३३४(१) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १५८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे ७ हजार ५०० रुपये किमतीचा जुना वापरता डीव्हीआर व हार्ड डिस्क आणि दानपेटीतील दोन हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ९ हजार ५०० रुपयांचा समावेश आहे.
मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर आणि हार्ड डिस्कच चोरीला गेल्याने या प्रकरणाचा तपास पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे. या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













