चिपळूण : निधीची तरतूद होईपर्यंत चिपळूणची जुनी नगरपरिषद इमारत पाडू देणार नाही, आमदार भास्कर जाधव यांची ठाम भूमिका

banner 468x60

चिपळूण नगरपरिषदेच्या सुमारे १५० वर्षे जुन्या इमारतीच्या पाडकामावरून आता नवा मुद्दा समोर आला आहे. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी पुरेशा निधीची ठोस तरतूद होईपर्यंत सध्याची जुनी इमारत पाडू नये, अशी ठाम भूमिका आमदार भास्कर जाधव यांनी घेतली आहे. ही ऐतिहासिक वास्तू हेरिटेज म्हणून जतन करण्याचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी नगरपरिषदेकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच, नगरपरिषदेला १६ डिसेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत असल्याने तोपर्यंत ही इमारत पाडू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चिपळूण नगरपरिषदेची जुनी इमारत ‘जुनी शेंगदाणा बिल्डिंग’ म्हणून ओळखली जाते. ही इमारत पाडून त्या जागी नवीन इमारत उभारण्याचे नियोजन असल्याचे समजते. मात्र, नवीन इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे २५ ते ३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या एकूण खर्चाच्या किमान ५० टक्के निधीची ठोस तरतूद झाल्याशिवाय सध्याची इमारत पाडण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

१५० वर्षांची ऐतिहासिक वास्तू जतन करण्याची मागणी

ब्रिटिशकालीन असलेली ही इमारत सुमारे दीडशे वर्षांनंतरही उभी आहे. याउलट, नगरपरिषदेने नंतर बांधलेली दुसरी इमारत अवघ्या २५ ते ३० वर्षांत निकामी झाल्याने ती पाडावी लागली. त्या ठिकाणी अद्याप नवीन बांधकाम सुरू झालेले नाही. या अनुभवाचा विचार करून नवीन बांधकामाचे नियोजन आणि निधीची उपलब्धता याबाबत स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

चिपळूणमधील मटण मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मंडई, शासकीय विश्रामगृह आणि इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र या वास्तूंचा पूर्वेतिहास आणि सद्यस्थिती लक्षात घेता, जुन्या नगरपरिषद इमारतीबाबत घाईघाईने निर्णय घेऊ नये, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन बैठक घ्या!

या प्रश्नावर शहरातील ज्येष्ठ, जाणकार आणि अनुभवी नागरिकांना विश्वासात घेऊन पक्षविरहित बैठक आयोजित करावी, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे. या बैठकीत नवीन इमारतीचा आराखडा, बांधकामाचा अंदाजित खर्च, निधीची उपलब्धता आणि काम पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी यावर सविस्तर चर्चा व्हावी, असे त्यांनी सुचवले आहे.

नगराध्यक्षा यासंदर्भात संपर्क साधून बैठक आयोजित करतील, अशी अपेक्षा व्यक्त करत या बैठकीत आपली सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

‘विकासाच्या आड कधीही आलो नाही’

पत्रकारांशी बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, “विकासाच्या कामात मी कधीही राजकारण आणले नाही. माझ्या बाबतीत मात्र अनेकांनी राजकारण केले. तरीही माझ्या राजकीय कारकिर्दीत मी विकासाच्या आड कधीही आलो नाही.”

मात्र, चिपळूण नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीच्या बाबतीत पुरेशा निधीची तरतूद आणि योग्य नियोजन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही वास्तू अद्याप सुस्थितीत असल्याने तिचे ऐतिहासिक महत्त्व जपत हेरिटेज वास्तू म्हणून जतन करण्याचा विचार व्हावा, असे त्यांनी म्हटले.

१६ डिसेंबरपर्यंत चिपळूण नगरपरिषदेच्या या जुन्या इमारतीला हात लावू देणार नाही, अशी ठाम भूमिका आमदार भास्कर जाधव यांनी मांडल्याने आता नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *