साखरपा मार्गावरील वांझोळे येथे घडलेल्या बहुचर्चित सुवर्णकार अपहरण व दरोडा प्रकरणातील वर्षभरापासून फरार असलेल्या चार आरोपींना जेरबंद करण्यात देवरुख पोलिसांना यश आले आहे. कल्याण, नवी मुंबई आणि बारामती परिसरातून या चारही आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे प्रकरणातील सर्व १३ संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेली अर्टिगा कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
१७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडवली-सह्याद्रीनगर येथील सुवर्ण व्यावसायिक धनंजय केतकर यांची चारचाकी वांझोळे परिसरात अडवण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी केतकर यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. त्यांच्या ताब्यातील सुमारे १४ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. त्यानंतर केतकर यांना वाटूळ परिसरात सोडून आरोपी पसार झाले होते.
घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुख पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. तपासादरम्यान यापूर्वी नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र टोळीतील चार आरोपी वर्षभरापासून पोलिसांना चकवा देत फरार होते.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स, संशयास्पद बँक व्यवहार तसेच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. तांत्रिक विश्लेषक रमिझ शेख यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके मुंबई आणि पुणे परिसरात रवाना करण्यात आली.
पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करत सापळा रचला. या कारवाईत महेश राया मोरे, तेजस रघुनाथ तांडेल, दशरथ मारुती साळुंखे आणि सचिन हरिभाऊ खुडे या चार आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी सचिन खुडे याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली अर्टिगा कार जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव, नितीन जाधव, प्रशांत मसुरकर, हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, चालक सचिन पवार, सचिन लगारे आणि सुहास लाड यांच्या पथकाने केली.
वर्षभर फरार असलेल्या आरोपींचा सातत्याने पाठपुरावा करत अखेर त्यांना अटक करण्यात आल्याने या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण पूर्णविराम मिळाला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













