देवरूख : धामणीत चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न, सीसीटीव्हीत चोरटा कैद; ग्रामस्थांनी संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले,

banner 468x60

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चार दुकानांचे शटर फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्यात आला असला, तरी दुकानातील दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेनंतर ग्रामस्थांनी संशयित व्यक्तींचा पाठलाग करून काही जणांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, संशयितांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

धामणी येथे भालचंद्र सप्रे यांच्या मालकीचे दुकान गाळे असून, त्यामध्ये मेडिकल, किराणा तसेच हार्डवेअरची दुकाने आहेत. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. त्यानंतर चार दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी मेडिकल दुकानातील काही रक्कम चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.


सकाळी दुकानदारांना दुकानांची शटर उचकटलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे दुकानदारांसह ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. दुकानाबाहेरील कॅमेरा फोडण्यात आला असला, तरी दुकानाच्या आतील बाजूस असलेल्या दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित चोरटा कैद झाल्याचे समोर आले.


घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर ग्रामस्थांनी संशयित व्यक्तींचा शोध सुरू केला. याचदरम्यान तुरळ परिसरात काही व्यक्ती ग्रीस लावण्याच्या बहाण्याने फिरताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. काही संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी संशयितांना मारहाण केल्याचेही सांगण्यात येत आहे.


पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर संशयितांची सखोल चौकशी होईल आणि धामणीतील चोरीच्या प्रयत्नाचा तपास लागेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र, संशयितांवर चोरीचा गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या व्यक्तींची ओळख, घटनास्थळी आढळलेले पुरावे, संशयितांच्या हालचाली आणि त्यांच्याकडील वस्तू यांची सखोल तपासणी केली असती, तर चोरीच्या प्रयत्नाचा छडा लावण्यास मदत झाली असती, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करावा, अशी मागणी होत आहे.
धामणीतील घटनेनंतर त्याच रात्री सावर्डे येथे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या स्पेअरपार्ट दुकानाचे शटर फोडून सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सलग घडलेल्या या घटनांमुळे महामार्गालगतच्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धामणी आणि सावर्डे येथील चोरीच्या घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा पोलिसांनी तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे. दोन्ही घटनांची वेळ, दुकानांची निवड आणि शटर फोडण्याची पद्धत यांचा तपास करून एकाच टोळीचा सहभाग आहे का, हे स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दुकानांना लक्ष्य करणारी फिरती चोरट्यांची टोळी सक्रिय असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी महामार्गालगतच्या दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

धामणी येथे ग्रामस्थांच्या हाती लागलेल्या संशयितांची या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशी करावी. त्यांच्या हालचाली, वाहनांची माहिती, सीसीटीव्ही फुटेज तसेच सावर्डे येथील चोरीच्या घटनेशी त्यांचा काही संबंध आहे का, याचा तपास करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, महामार्गालगतच्या व्यापारी आस्थापनांमध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, संशयास्पद व्यक्ती व वाहनांची तपासणी करावी आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *