चिपळूण तालुक्यातील उक्ताड येथे जावयाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याला सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या ६४ वर्षीय सासऱ्यालाही मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील उक्ताड येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास उक्ताड गणेश मंदिर परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी सुभाष बाजी लोटेकर (वय ६४, व्यवसाय सेवानिवृत्त, रा. उक्ताड, कालभैरव मंदिराशेजारी, ता. चिपळूण) हे त्यांचे जावई समीर काकडे, चालक कृष्णा काळे आणि क्लिनर ओंकार चव्हाण यांच्यासोबत कालभैरव मंदिर, उक्ताड येथून जावयाच्या गाडीकडे पायी जात होते.
हे सर्वजण रामभाऊ गोरीवले यांच्या घराजवळ आले असता उक्ताडच्या दिशेने दोन मोटारसायकली आल्या. यावेळी संबंधित व्यक्तींनी त्यांचा रस्ता अडवला. अॅक्टिव्हा मोटारसायकल क्रमांक एमएच-०८-बीए-४३७८ आणि बुलेट मोटारसायकल क्रमांक एमएच-१२-एक्सएस-६१६४ यावरून आलेल्या आयुष अनिल शिंदे, पार्थ राकेश शिंदे आणि आर्यन अनिल शिंदे यांनी सुभाष लोटेकर यांचे जावई समीर काकडे यांना हाताच्या थापटांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
जावयाला मारहाण होत असल्याचे पाहून सुभाष लोटेकर हे त्यांना सोडवण्यासाठी मध्ये गेले. त्यावेळी आरोपी क्रमांक चार नितीन रामचंद्र शेळके याने लोटेकर यांच्या कानाखाली मारून त्यांना बाजूला ढकलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर समीर काकडे यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला हातातील कड्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी सुभाष लोटेकर यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी आयुष अनिल शिंदे, पार्थ राकेश शिंदे, आर्यन अनिल शिंदे आणि नितीन रामचंद्र शेळके, सर्व रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण, यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११५(२), ११८(१), १२६(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.१५ वाजता घडली असून, याबाबत २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.१० वाजता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













