भूमी अभिलेख विभागाशी संबंधित अर्धन्यायिक स्वरूपाची प्रलंबित अपील प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात २२ सप्टेंबर रोजी ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत’ आयोजित करण्यात आली आहे.
ही लोकअदालत २२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, रत्नागिरी येथे होणार आहे. परस्पर संमती आणि सामोपचाराच्या माध्यमातून वाद निकाली काढणे हा या लोकअदालतीचा प्रमुख उद्देश आहे.
या लोकअदालतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, लांजा आणि राजापूर या नऊही तालुक्यांतील पात्र प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकार परस्पर संमतीने वाद मिटविण्यास तयार आहेत, अशा प्रकरणांना प्राधान्याने निकाली काढण्यात येणार आहे.
लोकअदालतीत प्रकरण सादर करण्यासाठी इच्छुक पक्षकारांनी महसूल व वन विभागाच्या नियमांनुसार ‘प्रपत्र अ’मधील ‘महसूल लोकअदालत तडजोडनामा अर्ज’ भरावा लागणार आहे. पक्षकारांनी मान्य केलेल्या परस्पर संमतीच्या अटींनुसार संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात येईल.
प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा होण्यासोबतच पक्षकारांचा वेळ आणि न्यायालयीन खर्च वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, रत्नागिरी येथे ०२३५२-२२२८६३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













