रत्नागिरी येथे पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या व्यक्तींच्या कुझर गाडीला आग लावल्याची धक्कादायक घटना शहरातील आठवडा बाजार परिसरात घडली. लॉजच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाच्या काचा फोडून त्यानंतर पेट्रोल अथवा अन्य ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने वाहन पेटविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अशोक नागाप्पा गोठेकर (वय २७, रा. कडेगाव, सांगली) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे मित्र अशोक बागडे (रा. कडेगाव, सांगली) यांनी आपल्या मुलीचा आणि जावयाचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी रत्नागिरीला जायचे असल्याचे सांगितले होते. त्यासाठी मोठी गाडी घेऊन येण्यास त्यांनी गोठेकर यांना सांगितले होते. त्यानुसार गोठेकर यांनी राहूल काटकर (रा. सांगली) यांच्या मालकीची कुझर गाडी (एमएच-१०-बीएन-७१५२) भाड्याने घेतली आणि १६ सप्टेंबर रोजी दुपारी सांगलीहून रत्नागिरीकडे रवाना झाले.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते रत्नागिरीत पोहोचले. त्यानंतर संशयिताच्या कुटुंबीयांशी चर्चा करून पती-पत्नीमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढे रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात जाऊन प्रभारी अधिकाऱ्यांच्या समक्ष निर्णय घेण्याचे ठरले.
दरम्यान, सांगलीहून आलेल्या फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आठवडा बाजार परिसरातील एका लॉजमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास लॉजमधील एका कर्मचाऱ्याने फिर्यादींच्या खोलीत जाऊन पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या गाडीला आग लागल्याची माहिती दिली.
फिर्यादी आणि त्यांचे सहकारी तातडीने पार्किंगमध्ये गेले असता अग्निशमन दलाचे कर्मचारी वाहनाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये संशयित आकाश खेत्री हा वाहनाच्या काचा फोडताना आणि त्यानंतर वाहनाला आग लावताना दिसून आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेत वाहनाचे सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













