चिपळूण तालुक्यातील कळकवणे-ऐनाडवाडी येथे घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत कपाटातील लॉकरमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राकेश प्रभाकर सुर्वे (रा. कळकवणे, ऐनाडवाडी, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध संशयावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून १० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत चोरीची ही घटना घडली. कळकवणे-ऐनाडवाडी येथील सेवानिवृत्त दीपक रत्नाकर शिंदे (वय ६३) यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्याने पत्र्याच्या कपाटातील लॉकर उघडले.
लॉकरमधून सुमारे दोन तोळे वजनाचा सोन्याचा हार, दीड तोळे वजनाचे कानातील फुल्ले व पट्टी, एक ग्रॅम वजनाची नथणी, अडीच ग्रॅम वजनाचे ‘ॐ’ नावाचे गळ्यातील पान तसेच १ हजार ५०० रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला.
चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे १ लाख १५ हजार ५०० रुपये, तर रोख रकमेसह एकूण १ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी दीपक शिंदे यांनी १० सप्टेंबर रोजी रात्री ९.३८ वाजता चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून राकेश प्रभाकर सुर्वे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













