दाभोळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज, 11 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास दाभोळकरवाडी येथे एका महिलेला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, याच महिलेवर मागील महिन्यातही कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला होता. त्यामुळे एकाच महिलेला महिनाभरात दुसऱ्यांदा कुत्र्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.
दाभोळकरवाडी येथील श्रद्धा स्वप्निल दाभोळकर (वय ३६) या आज सकाळी घरासाठी लाकूडफाटा काढण्यासाठी गेल्या होत्या. त्या लाकूडफाटा काढत असताना अचानक एका कुत्र्याने मागून येत त्यांच्या उजव्या पायाला चावा घेतला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या घाबरल्या. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी दाभोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर आवश्यक प्राथमिक उपचार करण्यात आले.
दरम्यान, मागील महिन्यातही श्रद्धा दाभोळकर यांना याच परिसरात कुत्र्याने चावा घेतला होता. त्या वेळीही दाभोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. एका महिन्याच्या आत पुन्हा त्यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याने भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे गांभीर्य समोर आले आहे.
दाभोळ परिसरातील विविध भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांमुळे धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अचानक कुत्रे अंगावर धावून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकाच महिलेला महिनाभरात दोन वेळा कुत्र्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. भविष्यात एखाद्या लहान मुलावर किंवा ज्येष्ठ नागरिकावर गंभीर स्वरूपाचा हल्ला होण्यापूर्वी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी दाभोळ येथील ग्रामस्थांनी केली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













