चुकीची कामे करणाऱ्या तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा कडक इशारा गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.

पंचायत समिती दापोलीची आमसभा राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तब्बल सहा तास चाललेल्या या मॅरेथॉन आमसभेत तालुक्यातील विविध विभागांशी संबंधित जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांची प्रभावी दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना कदम यांनी थेट जाब विचारत संबंधित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

खड्डे भरणीच्या कामांची चौकशी
दापोली तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न आमसभेत चांगलाच गाजला. रस्त्यांच्या दुरवस्थेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरत कदम यांनी मागील वर्षी करण्यात आलेल्या सर्व खड्डे भरणीच्या कामांची क्वालिटी कंट्रोलमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. संबंधित कामांचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य आणि प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता याची तपासणी करून सविस्तर अहवाल चार दिवसांत सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
रस्त्यांची कामे करूनही काही ठिकाणी पुन्हा खड्डे पडत असतील, तर त्यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. सरकारी निधीतून होणाऱ्या कामांमध्ये दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते खोदणाऱ्या महावितरणलाही सूचना
महावितरणकडून वीजवाहिन्यांची कामे करताना रस्ते तसेच सिमेंट गटारे फोडली जात असल्याचा मुद्दाही आमसभेत उपस्थित झाला. यावर कदम यांनी स्पष्ट भूमिका घेतली. वीजवाहिन्यांची कामे करण्यासाठी रस्ते अथवा गटारे खोदण्यात आली असतील, तर काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणांची दुरुस्ती महावितरणनेच करावी. अन्यथा दुरुस्तीसाठी आवश्यक निधी संबंधित विभागाकडे वर्ग करावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
विविध शासकीय विभागांमध्ये समन्वयाचा अभाव राहता कामा नये. एका विभागाच्या कामामुळे दुसऱ्या विभागाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे, असेही कदम यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात महावितरणकडून खोदण्यात आलेल्या रस्त्यांचा स्वतंत्र आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांनी दिल्या.
स्मार्ट मीटरबाबत नागरिकांना दिलासा
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरही आमसभेत सविस्तर चर्चा झाली. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर परस्पर बसविले जाणार नाहीत, असे शासनाच्या निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आले असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले. नागरिकांमध्ये या विषयाबाबत गैरसमज निर्माण होणार नाहीत, याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
‘पीएम सूर्यघर’ योजनेचा प्रत्येक घराला लाभ मिळवून द्या
‘पीएम सूर्यघर योजने’चा लाभ दापोली तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळावा, यासाठी अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांना योजनेची माहिती द्यावी, असे निर्देश कदम यांनी दिले.
गावागावात नागरिकांना मार्गदर्शन करून अर्ज व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात यावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक घरापर्यंत प्रशासन पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चुकीच्या वीज बिलावर कठोर कारवाईचा इशारा
एका ग्राहकाला तब्बल २१ हजार रुपयांचे चुकीचे वीज बिल पाठविण्यात आल्याची तक्रार आमसभेत मांडण्यात आली. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी अथवा कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश कदम यांनी दिले.
ग्राहकांची जाणीवपूर्वक फसवणूक झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास केवळ प्रशासकीय कारवाई न करता संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दापोलीतील पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा असल्याने या भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
शाळांना सुट्टी असली तरी एसटी फेऱ्या बंद करू नका
एसटी प्रशासनाशी संबंधित प्रश्नांवरही आमसभेत नागरिकांनी विविध तक्रारी मांडल्या. शाळांना सुट्टी असली म्हणून ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या बंद करू नयेत. या फेऱ्या केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून त्या गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश कदम यांनी एसटी प्रशासनाला दिले.
एसटीच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात नुकसान झालेल्या बाधिताला वर्ष उलटूनही नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे प्रकरणही आमसभेत समोर आले. या प्रकरणात विलंब न करता संबंधित बाधिताला तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश कदम यांनी दिले.
भूसंपादनासाठी ४६ कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा
दापोली तालुक्यातील भूसंपादनाच्या प्रश्नावरही चर्चा झाली. आवश्यक असलेल्या तब्बल ४६ कोटी रुपयांच्या निधीसाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती राज्यमंत्री कदम यांनी दिली. संबंधित प्रकरणांचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंबा-काजू हमीभावापासून आरोग्य, महसूलपर्यंत प्रश्नांची चर्चा
आमसभेत आंबा-काजू हमीभाव, जलजीवन मिशन, महसूल विभाग, वनविभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख तसेच पोलीस विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी, प्रलंबित कामे आणि विभागीय स्तरावरील समस्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
प्रत्येक विभागाने जनतेच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्यावर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी. आमसभेत मांडण्यात आलेल्या सर्व समस्या आणि मागण्यांवर संबंधित विभागांनी येत्या सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश कदम यांनी दिले.
जनतेच्या पैशातून विकासकामे केली जातात. त्यामुळे प्रत्येक काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष अथवा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या आमसभेला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, उपसभापती नम्रता तोडणकर, नगराध्यक्ष कृपा घाग, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्यासह पंचायत समिती सदस्य, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













