Breaking News

दापोली : 808 अन्न विक्रेत्यांना FoSTaC प्रशिक्षण, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेवर भर, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती

banner 468x60

दापोली शहरातील स्ट्रीट फूड विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या खाद्य व्यवसायिकांसाठी अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सुरक्षित अन्न हाताळणीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय FoSTaC (Food Safety Training and Certification) अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दापोली येथील सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृहात अन्न व औषध प्रशासन, Nestlé India आणि NASVI यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

banner 728x90

या प्रशिक्षणाला दापोली शहरातील तब्बल ८०८ अन्न विक्रेते व खाद्य व्यवसायिकांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान अन्न स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, वैयक्तिक स्वच्छता, खाद्य व्यवसायाच्या परिसराची स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना योगेश कदम यांनी, “कोकणची ओळखच स्वच्छतेची असून, खाद्य व्यावसायिकांनी या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा,” असे आवाहन केले.

केवळ दंडात्मक कारवाई करणे हे शासनाचे उद्दिष्ट नसून, हॉटेल व्यावसायिक, पथविक्रेते आणि अन्न व्यवसायिकांना योग्य प्रशिक्षण देऊन सुरक्षित व स्वच्छ अन्नव्यवस्थेसाठी सक्षम करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात हॉटेल्स तसेच खाद्य स्टॉल्सच्या स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अन्न सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन

FoSTaC प्रशिक्षक गुरुनाथ सावंत यांनी प्रशिक्षणार्थींना अन्न सुरक्षितपणे हाताळण्याच्या विविध पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. अन्न तयार करताना आणि विक्री करताना स्वच्छता राखणे, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे, खाद्यपदार्थ सुरक्षित पद्धतीने साठवणे तसेच व्यवसायाच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे महत्त्व यावेळी समजावून सांगण्यात आले.

प्रशिक्षणार्थींना मोफत हायजिन किट व प्रमाणपत्र

या उपक्रमात सहभागी अन्न व्यवसायिकांना Nestlé Indiaच्या वतीने मोफत हायजिन किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये अन्न व्यवसायात स्वच्छता व सुरक्षितता राखण्यासाठी उपयुक्त साहित्य, किचन कॅप आदी वस्तूंचा समावेश होता. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना FoSTaC प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले.

मॅगीच्या ५० वर्षांच्या प्रवासानिमित्त विशेष टपाल तिकीटाचे अनावरण

कार्यक्रमादरम्यान मॅगीच्या ५० वर्षांच्या प्रवासानिमित्त विशेष टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसोबतच खाद्य व्यवसाय क्षेत्रातील विविध उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली.

८०८ व्यावसायिकांच्या नोंदणीसाठी विशेष नियोजन

दापोली शहरातील जास्तीत जास्त अन्न व्यवसायिकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नोंदणी आणि आयोजनाचे विशेष नियोजन करण्यात आले होते. सचिन तोडणकर, मंगेश मोरे, दिनेश नाईक आणि बाळासाहेब नकाते यांनी व्यावसायिकांची नोंदणी करून घेण्यापासून ते प्रशिक्षणाच्या नियोजनापर्यंत महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

यामुळे दापोली शहरातील तब्बल ८०८ अन्न विक्रेते आणि खाद्य व्यवसायिकांना एकाच उपक्रमातून अन्न सुरक्षेबाबत आवश्यक प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रमास दापोली पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, FDA कोकण विभागाचे सहआयुक्त डॉ. सचिन जाधव, रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त शशिकांत यादव, NASVIचे वरिष्ठ व्यवस्थापक व FoSTaC प्रशिक्षक गुरुनाथ सावंत, ज्येष्ठ समाजसेवक दीपक महाजन, भगवान घाडगे, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, हॉटेल व खाद्यपदार्थ व्यावसायिक, महिला बचत गट तसेच उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दापोलीतील स्ट्रीट फूड विक्रेते आणि छोट्या खाद्य व्यवसायांमध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यातून अन्न व्यवसायिकांमध्ये अन्न सुरक्षेबाबत जागरूकता वाढून नागरिकांना अधिक सुरक्षित व आरोग्यदायी अन्न उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *