दापोली-खेड महामार्गावर मोकाट गुरांचा हैदोस; काळकाई कोंड परिसरात रात्री वाहनचालकांचा जीव धोक्यात

banner 468x60

दापोली आणि खेड तालुक्यांना जोडणाऱ्या प्रमुख महामार्गावर सध्या मोकाट गुरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, काळकाई कोंड परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर ठाण मांडून बसणाऱ्या गुरांमुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या समस्येमुळे चाकरमानी, पर्यटक तसेच स्थानिक वाहनचालक त्रस्त झाले असून, प्रशासनाने तातडीने मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दापोली-खेड मार्ग हा घाट व अनेक धोकादायक वळणांचा असल्याने वाहनचालकांना आधीच सावधगिरीने प्रवास करावा लागतो. त्यात काळकाई कोंड परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध गुरांचे कळप बसलेले किंवा फिरताना दिसतात. वाहनांच्या प्रकाशात ही गुरे अचानक समोर येत असल्याने चालकांना प्रसंगी अचानक ब्रेक लावावे लागतात. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

banner 728x90


विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. मोकाट गुरे अचानक रस्त्यावर आल्याने अनेकदा किरकोळ तसेच गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही या गुरांमुळे मोठी कसरत करावी लागत आहे.


महामार्गावर वारंवार मोकाट गुरांचा वावर होत असतानाही त्यांच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


काळकाई कोंड परिसरासह दापोली-खेड महामार्गावर मोकाट गुरांचा तातडीने बंदोबस्त करावा, संबंधित पशुमालकांवर कारवाई करावी आणि रात्रीच्या वेळी वाहनचालकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *