रत्नागिरी : सातारा-पुणे महामार्गावर अपघात, रत्नागिरीतील तरुणीचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरीतील कोकणनगर येथील संस्कृती राजू पिसे (वय २१) हिचा सातारा-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शिंदेवाडी पुलाखाली सर्व्हिस रोडवर १९ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.४५ वाजता हा अपघात घडला.

banner 728x90

प्रतिक राजेंद्र ओतारी (वय २७, रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा), ऋतिक आणि संस्कृती हे तिघे दुचाकीवरून शिंदेवाडीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी साताऱ्याकडून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतरापर्यंत ट्रकसोबत ओढली गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात संस्कृती पिसे हिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. प्रतिक ओतारी व ऋतिक हे दोघेही जखमी झाले असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर ट्रकचालक करमहुसेन गयासुदिदन चौधरी (रा. आमगाव, तहसील नौगड, उत्तर प्रदेश) याने घटनास्थळी ट्रक सोडून पलायन केल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी प्रतिक ओतारी यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, ट्रकचालकाविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप करण्यात आला असून, अपघाताचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *