रत्नागिरी : अखेर पोलिस प्रशासनाकडून दखल, संध्या कोसुंबकर यांचे उपोषण स्थगित, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या निर्देशानंतर हालचाली

banner 468x60

गेल्या सहा दिवसांपासून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या संध्या कोसुंबकर यांच्या आमरण उपोषणाची अखेर पोलिस प्रशासनाने दखल घेतली. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गुरुवारी (२० ऑगस्ट) रत्नागिरी जिल्हा पोलिस मुख्यालयात या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर उपोषणस्थळी पोलिस अधिकाऱ्यांना पाठवून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर रात्री सुमारे आठ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत लेखी पत्र देऊन संध्या कोसुंबकर आणि राकेश जंगम यांच्या आईला ज्यूस देऊन उपोषण स्थगित करण्यात आले.

banner 728x90

संध्या कोसुंबकर या १५ ऑगस्टपासून राकेश जंगम प्रकरणात तत्कालीन जयगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुलदीप पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसल्या होत्या. उपोषणाचा सहावा दिवस सुरू असतानाही मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले होते. गुरुवारी (दिनांक २० ऑगस्ट) सकाळपासून कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना हे रत्नागिरी पोलिस मुख्यालयात होते. यावेळी संध्या कोसुंबकर यांच्या सहकारी महिलांनी पोलिस मुख्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

महिलांनी उपोषणाची पार्श्वभूमी, मृत राकेश जंगम प्रकरणातील आरोप आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या याबाबत मीना यांना माहिती दिली. या भेटीनंतर विशेष पोलिस महानिरीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी माईनकर आणि पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांना उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे दिवसभर प्रशासनाच्या हालचालींकडे लक्ष लागले होते.

यानंतर रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास PI विवेक पाटील उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी अभिजीत थोरात यांच्या सही-शिक्क्याचे लेखी पत्र संध्या कोसुंबकर यांना दिले आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, १५ ऑगस्ट २०२६ पासून तत्कालीन जयगड पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी कुलदीप पाटील यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असून, उपोषण स्थगित करावे, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. लेखी पत्र मिळाल्यानंतर संध्या कोसुंबकर आणि मृत राकेश जंगम यांच्या आईला ज्यूस देण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले.

सहा दिवसांच्या आंदोलनानंतर प्रशासन झुकले

सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाकडे अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष दिले. विशेष पोलिस महानिरीक्षकांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याच हस्तक्षेपानंतर उपोषणकर्त्यांच्या मागण्या वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याचे आश्वासन आणि प्रत्यक्ष कारवाई यामध्ये आता किती अंतर राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वरिष्ठ पोलिस कार्यालयाकडे मागण्या सादर झाल्यानंतर त्यावर कोणती कार्यवाही होते, चौकशीचे आदेश निघतात का आणि उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अधिकृत उत्तरे मिळतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *