दापोली : फणस नाका येथे ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने मारहाण, कटर ब्लेड घेऊन ठार मारण्याची धमकी

banner 468x60

दापोली तालुक्यातील फणसू येथे प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायातील वादातून ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला बांबूने बेदम मारहाण करून कटर ब्लेडच्या साहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दापोली तालुक्यातील फणसु येथे घडली. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता फणसु, ता. दापोली येथे घडली. या प्रकरणी सतीश दत्ताराम शिगवण (वय ३६, व्यवसाय ट्रॅव्हल्स, रा. मगीज मांडवकरवाडी, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रवी किरण उके (रा. फणसु, ता. दापोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सतीश शिगवण हे मुंबई येथून त्यांच्या मालकीच्या टेम्पो ट्रॅव्हल्समधून प्रवासी घेऊन दापोली येथे आले होते. दापोली येथे प्रवासी उतरवल्यानंतर ते टेम्पो ट्रॅव्हल्स घेऊन विश्रांतीसाठी त्यांचे मित्र प्रभाकर वानकर यांच्या उन्हवरे येथील घरी जाण्यासाठी निघाले.

दरम्यान, फणस नाका येथे त्यांनी रस्त्याच्या बाजूला टेम्पो ट्रॅव्हल्स उभी केली. त्यावेळी आरोपी रवी उके तेथे आला. ‘या ठिकाणी प्रवासी गाडीत भरायचे नाहीत तसेच वाकवली गावाच्या पुढे यायचे नाही,’ असे म्हणत त्याने फिर्यादीसोबत वाद घालण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी सतीश शिगवण यांनी आरोपीला उगाच भांडू नको, असे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने हातातील बांबूने फिर्यादीच्या दोन्ही पायांवर, कंबरेवर, मांडीवर, पोटरीवर, दोन्ही हातांवर तसेच डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत सतीश शिगवण जखमी झाले.

इतकेच नव्हे तर आरोपीने शिवीगाळ करत हातातील कटर ब्लेड घेऊन फिर्यादीच्या अंगावर मारण्यासाठी धावून येत ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर जखमी सतीश शिगवण यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६९/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ११८(२), ३५१(२), ३५२ आणि १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांचाही नोंदवहीत उल्लेख करण्यात आला आहे.

या घटनेमुळे फणसु परिसरात खळबळ उडाली असून, प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायातील वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *